शाळेच्या पहिल्याच दिवसानंतर चिमुकल्याचा सर्पदंशाने मृत्यू

मेहकर तालुक्यातील राजगड येथील हृदयद्रावक घटना; उपचारासाठी नेत असतानाच सहा वर्षीय बालकाची प्राणज्योत मालवली
बुलढाणा | प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील राजगड येथे सर्पदंशामुळे सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळेचा पहिला दिवस आनंदात साजरा करून घरी परतलेल्या राज राठोड (वय ६) या चिमुकल्याचा दुसऱ्याच दिवशी उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजने २ जुलै रोजी डोणगाव येथील जीवन विकास कॉन्व्हेंटमध्ये शाळेचा पहिला दिवस पूर्ण केला होता. घरी परतल्यानंतर त्याने आई-वडिलांसोबत शाळेतील अनुभव आणि आठवणी आनंदाने सांगितल्या. रात्री जेवणानंतर तो झोपला.
रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने घराचा दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता. मध्यरात्रीच्या सुमारास राज अचानक रडू लागला. सुरुवातीला एखाद्या छोट्या प्राण्याने चावा घेतला असावा, असे कुटुंबीयांना वाटले. मात्र, काही वेळातच त्याच्या पायावर सूज येऊन रंग बदलू लागल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आले.
कुटुंबीयांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
घटनेनंतर घराची पाहणी केली असता एका खोक्यात साप आढळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राजगड गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका निष्पाप चिमुकल्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून वेळोवेळी करण्यात येते. सर्पदंशाचा संशय आल्यास कोणताही विलंब न करता तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.



