agricultureBuldhanacitynewsLatest NewsMaharashtra

शेतात वर्षभरापासून पाणी साचल्याने शेतीचे तलावात रूपांतर; संतप्त शेतकऱ्यांचा इच्छामरणाचा इशारा

मेहकर तालुक्यातील रायपूर पाचला शिवारातील शेतकऱ्यांचा आरोप; पाण्याचा निचरा न झाल्याने हळद, सोयाबीन, कापूस व तूर पिकांचे मोठे नुकसान

बुलढाणा | प्रतिनिधी

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील रायपूर पाचला शिवारात गेल्या वर्षभरापासून शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतीचे अक्षरशः तलावात रूपांतर झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पाण्याचा निचरा न झाल्यामुळे हळदीचे बियाणे पाण्यातच अडकून पडले असून सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांची पेरणीही रखडली आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी मागण्याचा इशारा दिला आहे.

रायपूर पाचला शिवारातील आठ ते दहा शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतीयोग्य जमीन जलमय झाली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रायपूर पाचला रस्त्याच्या कामादरम्यान पाण्याचा नैसर्गिक निचरा बंद झाल्यामुळे पावसाचे पाणी थेट शेतात साचत आहे. परिणामी, गेल्या वर्षभरापासून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांचा आरोप आहे की या समस्येबाबत जिल्हा परिषद आणि महसूल विभागाकडे अनेक वेळा निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान वाढत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

सध्या हळदीचे बियाणे पाण्यातच अडकून पडले आहे, तर सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांची पेरणी करता आलेली नाही. यामुळे चालू हंगाम धोक्यात आला असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी दिगंबर पाटील यांनी शेतात साचलेल्या पाण्यात बसून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनातून त्यांनी प्रशासनाच्या कथित दुर्लक्षाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. तातडीने पाण्याचा निचरा करून प्रश्न सोडविण्यात आला नाही, तर राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी मागण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, नुकसानग्रस्त शेतांची तातडीने पाहणी करून पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. या गंभीर प्रश्नावर प्रशासन कोणती भूमिका घेते आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button