AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत सफाई कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा आरोप; आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन

मोबाईल हिसकावल्याचा व मारहाणीचा आरोप; अटकेच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन, महापौरांच्या चर्चेनंतर कर्मचारी कामावर

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर झालेल्या कथित हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. झोन क्रमांक १ अंतर्गत आजाद नगर आणि द्वारका नगर परिसरात नाल्यातील कचऱ्यावरून झालेला वाद मारहाणीपर्यंत पोहोचल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. अटक न झाल्यास शहरातील स्वच्छता सेवा बंद करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र महापौरांशी झालेल्या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत पुन्हा कामावर हजेरी लावली.

ही घटना झोन क्रमांक १ अंतर्गत प्रभाग क्रमांक ५ मधील आजाद नगर आणि द्वारका नगर परिसरात घडली. सफाई कर्मचाऱ्यांनी नाल्यातील कचरा काढून बाजूला ठेवल्यानंतर एका नागरिकाने बोअरवेलच्या पाण्याच्या साहाय्याने तोच कचरा पुन्हा नाल्यात वाहून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याबाबत सफाई कर्मचाऱ्याने संबंधित व्यक्तीशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा वाद वाढत जाऊन कथित मारहाण झाल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, दुसरा कर्मचारी संपूर्ण घटना मोबाईलमध्ये चित्रीत करत असताना त्याचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला आणि त्यालाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी दोन व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली नसल्याचा आरोप करत सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. गाडगेनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत कर्मचाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची हमी आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी शहराची स्वच्छता राखण्याचे काम करत असताना स्वतःच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली. तसेच या घटनेनंतर कोणताही लोकप्रतिनिधी किंवा महापालिकेचा अधिकारी तातडीने त्यांच्या बाजूने उभा राहिला नसल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली.

त्यानंतर सर्व कर्मचारी अमरावती महानगरपालिकेत पोहोचले. महापौरांसोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले.

दरम्यान, या घटनेमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेतील विविध प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत. यापूर्वी अकोली मिनी कम्पोस्ट डेपो येथे कोणार्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून गंभीर हिंसक घटना घडली होती. तसेच वेतनासह विविध मागण्यांसाठी कोणार्क कंपनीचे सफाई कर्मचारी आणि वाहनचालकांनी अनेक वेळा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. परिणामी शहरातील स्वच्छता व्यवस्था वारंवार विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

शहराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी कोणार्क कंपनीकडे असली, तरी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आणि सेवा सुरळीत ठेवण्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसरीकडे, नागरिकांकडूनही स्वच्छतेबाबत सातत्याने तक्रारी केल्या जात असून, त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिसांची पुढील कारवाई, सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येणारे उपाय तसेच शहरातील स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि कोणार्क कंपनी कोणती ठोस पावले उचलतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button