Amaravti GramincitynewsLatest NewsMaharashtraMaharashtra Politicspoliticstivsa

दापोरी–जावरा रस्त्याचे काम रखडल्याने काँग्रेसचे आंदोलन

दोन वर्षांपूर्वी झाले भूमिपूजन; काम तातडीने सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

तिवसा | प्रतिनिधी

तिवसा तालुक्यातील दापोरी–जावरा मार्गाचे काम दोन वर्षांनंतरही सुरू न झाल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. या रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दापोरी आणि जावरा येथे नागरिक, शेतकरी आणि स्थानिकांच्या सहभागातून आंदोलन करण्यात आले. रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

दापोरी–जावरा मार्गाचे भूमिपूजन दोन वर्षांपूर्वी मोठ्या गाजावाजात करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे.

हा मार्ग शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सध्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली असून अपघातांचा धोका वाढल्याचे नागरिकांनी सांगितले.

आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेवर टीका केली. वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत, केवळ भूमिपूजन आणि घोषणांपुरताच विकास मर्यादित राहिल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.

दोन वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या या महत्त्वाच्या रस्त्याचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होणार, हा प्रश्न आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, प्रशासन यावर किती लवकर निर्णय घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button