वाशिममध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी; शेतकऱ्यांना दिलासा

घसरलेले बाजारभाव सावरले; समाधानकारक पावसानंतर प्रतिक्विंटल दर पुन्हा ७ हजारांच्या उंबरठ्यावर
वाशिम | प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी घसरलेले सोयाबीनचे बाजारभाव आता पुन्हा वाढू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला गती मिळाल्याने बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले असून त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर दिसून येत आहे.
मागील आठवड्यापूर्वी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल सुमारे ७ हजार ५०० रुपये दर मिळत होता. मात्र, अचानक झालेल्या घसरणीनंतर हा दर ६ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आला. दरातील या घसरणीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. शेतकऱ्यांमध्ये नव्याने आशावाद निर्माण झाला असून कृषी बाजारातील व्यवहारांनाही चालना मिळाली आहे. या सकारात्मक घडामोडींचा परिणाम म्हणून सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा झाली आहे.
सध्या वाशिम जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल सुमारे ७ हजार रुपये दर मिळत आहे. दरातील या वाढीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून, आगामी काळात पावसाची सातत्यपूर्ण स्थिती, उत्पादनाचा अंदाज आणि बाजारातील मागणी यावर दराची पुढील दिशा अवलंबून राहणार असल्याचे बाजार अभ्यासकांचे मत आहे.
दरम्यान, सोयाबीनच्या बाजारभावातील ही तेजी पुढील काही दिवस कायम राहते की पुन्हा चढ-उतार पाहायला मिळतात, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. बाजारातील बदलत्या परिस्थितीवर शेतकरी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.



