उशिरा मान्सून आणि वाढत्या उष्णतेचा फटका; वाशिममधील संत्रा बागा वाळल्या

मृग व आंबिया बहार धोक्यात; लाखो रुपयांच्या नुकसानीने संत्रा उत्पादक शेतकरी संकटात
वाशिम | प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर यंदा दुहेरी संकट कोसळले आहे. उशिरा दाखल झालेला मान्सून आणि सलग ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिलेले तापमान यामुळे जिल्ह्यातील अनेक संत्रा बागांमधील झाडे वाळून गेली आहेत. परिणामी मृग बहार आणि आंबिया बहार या दोन्ही हंगामांतील उत्पादन धोक्यात आले असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर तसेच इतर तालुक्यांतील अनेक संत्रा बागांमध्ये झाडे मोठ्या प्रमाणात वाळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्याच्या मध्यापासून संत्रा झाडांना बहारासाठी आवश्यक ताण मिळावा म्हणून नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा बंद केला होता. साधारणपणे दीड महिन्यांचा पाण्याचा ताण संत्रा पिकासाठी आवश्यक मानला जातो. मात्र, यंदा जून महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापर्यंतही समाधानकारक मान्सूनचा पाऊस न झाल्याने झाडांवरील पाण्याचा ताण दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ कायम राहिला.
त्यातच सलग अनेक दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे राहिल्याने संत्रा झाडांवर विपरीत परिणाम झाला. अनेक झाडे पूर्णपणे वाळून गेली असून मृग बहार आणि आंबिया बहार या दोन्ही हंगामांतील उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अनेक बागायतदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
नुकसानग्रस्त संत्रा बागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. तसेच हवामानातील बदलांचा विचार करून फळबागांसाठी विशेष मदत योजना आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचीही मागणी होत आहे.
दरम्यान, वाढते तापमान आणि अनियमित पावसामुळे फळबागांवरील संकट अधिक गडद होत असून शासन या नुकसानीची दखल घेऊन तातडीने मदतीची घोषणा करते का, याकडे वाशिम जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



