प्रस्तावित एमआयडीसीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; पटगोवारीत आंदोलनानंतर अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले

नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात प्रस्तावित असलेल्या सुमारे ३ हजार हेक्टर क्षेत्रावरील एमआयडीसी प्रकल्पाला स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. पटगोवारी गावात आज प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. या विरोधामुळे जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, रामटेक आणि पारशिवनी तालुक्यातील पटगोवारी, आमडी आणि परिसरातील अनेक गावांमध्ये प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाविरोधात नागरिकांचा रोष वाढताना दिसत आहे. सुमारे ३ हजार हेक्टर शेतजमिनीवर हा औद्योगिक प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर जमिनीचे सर्वेक्षण आणि मोजणी करण्यासाठी एमआयडीसी तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पटगोवारी गावात दाखल झाले होते. मात्र स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी एकत्र येत या प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शविला.
नागरिकांच्या निषेधानंतर अधिकाऱ्यांना कोणतीही मोजणी न करता माघारी परतावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचविण्यासाठी एकजूट दाखवत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, या भागातील बहुसंख्य कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. जमीन संपादित झाल्यास शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
या आंदोलनाचे विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाशिवाय स्थानिक शेतकरी आणि नागरिक स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरले. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत संवाद साधावा आणि त्यांची बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, प्रस्तावित एमआयडीसीमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार की शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होणार, यावर परिसरात चर्चा सुरू झाली आहे. मात्र सध्या तरी स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला आपला ठाम विरोध नोंदवला असून, या प्रकरणातील पुढील घडामोडींवर संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.



