AmravaticitynewsLatest NewsMaharashtraMaharashtra PoliticsMaharashtraPoliticspolitics

अमरावती विधान परिषदेत भाजपचा झेंडा! प्रवीण पोटे पाटील यांचा विक्रमी विजय

पहिल्याच फेरीत 390 मतांची कमाई; विजयाच्या कोट्यापेक्षा तब्बल 179 मते अधिक

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असलेल्या कोट्यापेक्षा तब्बल 179 मते अधिक मिळवत त्यांनी एकहाती विजयाची नोंद केली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते त्यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत एकूण 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीदरम्यान 6 मते अवैध ठरली, तर 421 मते वैध ठरल्याने विजयासाठी 211 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.

मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी तब्बल 390 मते मिळवत विजय निश्चित केला. त्यांनी आवश्यक कोट्यापेक्षा 179 मते अधिक मिळवत विरोधकांना मोठ्या फरकाने पराभूत केले.

तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना 31 मते मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांना मात्र एकही मत मिळवता आले नाही.

मतमोजणी प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे निवडणूक निरीक्षक तथा कामगार आयुक्त डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या उपस्थितीत पार पडली. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पूर्ण करण्यात आली.

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशिष येरेकर यांनी प्रवीण पोटे पाटील यांना अधिकृत विजयी प्रमाणपत्र प्रदान केले.

यावेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, ज्ञानेश्वर घ्यार, प्रसेनजित चव्हाण, अनिल भटकर आणि दादासाहेब दराडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अमरावतीच्या राजकीय वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा सुरू असून भाजपचा बालेकिल्ला आणखी मजबूत झाल्याचे मानले जात आहे. या विजयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button