पायाने तुडवलेल्या मैद्यापासून समोसे-कचोरी? जानेफळमधील स्वीट मार्टवर कारवाई

व्हायरल व्हिडिओनंतर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दुकान सील, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मेहकर प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ येथून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. समोसा, कचोरी आणि इतर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरला जाणारा मैदा चक्क पायाने तुडवला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ कारवाई करत संबंधित दुकानाला सील ठोकले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जानेफळ येथील जय अंबे स्वीट मार्टमध्ये हा प्रकार घडला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दुकानात काम करणारा कर्मचारी मादाराम प्रजापत हा पायाने मैदा तुडवत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. संबंधित मैद्याचा वापर समोसा, कचोरी आणि इतर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही घटना १८ जून रोजी दुपारच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. कोणीतरी गुप्तपणे या प्रकाराचे चित्रीकरण करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला. व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली.
घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय भोपळे यांनी पथकासह संबंधित दुकानाची पाहणी केली. तपासणीदरम्यान दुकानात कोणतेही खाद्यपदार्थ तयार होताना आढळून आले नाहीत तसेच अन्नसाठाही उपलब्ध नव्हता. मात्र व्हिडिओमधील दृश्यांच्या आधारे अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
यानंतर प्रशासनाने जय अंबे स्वीट मार्टला सील ठोकत कठोर कारवाई केली. या प्रकरणी दुकानमालक भगवानराम हिराराम प्रजापत आणि कर्मचारी मादाराम गोकलराम प्रजापत यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २७४ आणि २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ तसेच परवाना व नोंदणी नियम २०११ मधील विविध तरतुदींचे उल्लंघन झाल्याचेही तपासात समोर आले आहे. प्रशासनाने पुढील तपास सुरू ठेवला असून संबंधितांवर आणखी कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या घटनेमुळे खाद्यपदार्थांच्या निर्मितीतील स्वच्छता आणि गुणवत्ता नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या व्यवसायांमध्ये नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी नियमित तपासणी, कठोर निरीक्षण आणि दोषींवर कडक कारवाई आवश्यक असल्याची मागणीही जोर धरत आहे.



