AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ‘केमिकल टेक्नॉलॉजी’ अभ्यासक्रमाची सुवर्ण संधी

बारावी उत्तीर्ण विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम; प्रवेशासाठी मार्गदर्शन कक्ष सुरू

अमरावती प्रतिनिधी

बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर घडविण्याची सुवर्णसंधी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागाने उपलब्ध करून दिली आहे. रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित बी.टेक (केमिकल टेक्नॉलॉजी) अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी मिळणार आहे.

विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागामार्फत नवीन शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा बी.टेक (केमिकल टेक्नॉलॉजी) अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमांतर्गत फूड टेक्नॉलॉजी, पल्प अँड पेपर टेक्नॉलॉजी, ऑइल अँड पेंट टेक्नॉलॉजी तसेच पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी या विशेष शाखांचा समावेश करण्यात आला आहे.

या अभ्यासक्रमासाठी बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण आणि एमएच-सीईटी गुण प्राप्त विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत. अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), नवी दिल्ली यांची मान्यता प्राप्त असून तंत्रशिक्षण संचालनालयाचा ‘अ’ दर्जाही मिळाला आहे.

उच्च शिक्षणासह रोजगाराच्या संधी

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन, उत्पादन, सेवा क्षेत्र तसेच स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतात. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना बी.टेक पदवीसोबत त्यांनी निवडलेल्या विशेष तंत्रज्ञान विषयातील मायनर पदवीही प्रदान करण्यात येते.

या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ६० जागांची असून राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने निश्चित केलेल्या नियमांनुसार एमएच-सीईटीद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविली जाते.

अत्याधुनिक सुविधा आणि प्लेसमेंटची संधी

विद्यार्थ्यांसाठी विभागात सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा, यांत्रिकी कार्यशाळा, समृद्ध ग्रंथालय, उपकरण केंद्र, वसतिगृह, उपहारगृह, बँक, पोस्ट ऑफिस तसेच जलतरण तलाव यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

याशिवाय विद्यार्थ्यांना रोजगार मिळविण्यासाठी विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते. विविध नामांकित औद्योगिक कंपन्यांमार्फत नियमित प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन केले जाते. उन्हाळी सुट्टीदरम्यान विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधीही उपलब्ध करून दिली जाते.

संशोधन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर

केमिकल टेक्नॉलॉजी विभागातील अनेक माजी विद्यार्थी देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. काहींनी स्वतःचे उद्योग उभारले असून अनेकांनी परदेशातील विद्यापीठांमधून उच्च शिक्षण घेऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

विभागामध्ये विविध शासकीय संस्थांच्या सहाय्याने संशोधन प्रकल्प राबविण्यात आले असून अत्याधुनिक प्रयोगशाळा विकसित करण्यात आल्या आहेत. विभागातील अनेक संशोधकांनी आचार्य पदवी प्राप्त केली असून अनेक विद्यार्थी संशोधन कार्यात सहभागी आहेत.

तसेच विभागातील प्राध्यापकांनी फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, नेदरलँड, सिंगापूर, मलेशिया, दुबई, थायलंड, श्रीलंका आणि नेपाळ यांसारख्या देशांमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदविला असून त्यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहे.

प्रवेशासाठी मार्गदर्शन कक्ष सुरू

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासंदर्भात मार्गदर्शन मिळावे यासाठी विभागात विशेष मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी डॉ. पी. के. वानखडे (9405975273) आणि श्री. सी. बी. धीरवस्सी (9422543268) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागप्रमुख डॉ. ए. बी. नाईक यांनी केले आहे.

तसेच विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही अभ्यासक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button