57 लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी 25 लाखांची लाच मागितल्याचा आरोप

अमरावती मनपाच्या प्रभारी सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला एसीबीने घेतले ताब्यात; प्रशासकीय वर्तुळात खळबळ
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप समोर आले असून भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत प्रभारी सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. श्वान उत्पत्ती नियंत्रण, नसबंदी आणि लसीकरणाच्या कामाचे प्रलंबित असलेले सुमारे 57 लाख रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. या कारवाईमुळे महानगरपालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती महानगरपालिकेचे प्रभारी सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी सचिन छगनअप्पा बोंद्रे यांच्याविरोधात संबंधित तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदारांच्या संस्थेने महानगरपालिकेच्या अंतर्गत श्वान उत्पत्ती नियंत्रण, नसबंदी आणि लसीकरणाचे काम पूर्ण केले होते. या कामाचे सुमारे 57 लाख रुपयांचे बिल मंजुरीसाठी प्रलंबित होते.
तक्रारदारांच्या आरोपानुसार, हे बिल मंजूर करून देण्यासाठी सचिन बोंद्रे यांनी तब्बल 25 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात दोन लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. मात्र चर्चेनंतर ही रक्कम एक लाख रुपयांवर निश्चित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने 11 जून 2026 रोजी सापळा रचला. नियोजनानुसार कारवाई सुरू असताना संबंधित अधिकारी तक्रारदाराच्या दुचाकीवर बसून मनपा कार्यालयातून बाहेर पडले. मात्र त्यांना काहीसा संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. त्यानंतर ते शासकीय वाहनातून तेथून निघून गेले.
यामुळे एसीबीने पुढील तपासाची दिशा बदलत अधिक चौकशी सुरू ठेवली. तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे एसीबीच्या पथकाने सचिन बोंद्रे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे अमरावती महानगरपालिकेतील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रलंबित बिले मंजूर करण्यासाठी लाच मागितली जात असल्याच्या आरोपांमुळे नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. सरकारी यंत्रणांमधील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
ही कारवाई एसीबी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपअधीक्षक सुनील किनगे, पोलीस निरीक्षक नीलिमा सातव, रविंद्र सहारे तसेच उपेंद्र थोरात आणि वैभव जायले यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास तात्काळ भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.
मनपातील अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकरणात पुढे आणखी कोणते खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



