नागपुरात वाहनचोर टोळीचा पर्दाफाश! पारडी पोलिसांच्या जाळ्यात दोन आरोपी; पाच दुचाकी जप्त

नागपूर शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर आळा घालण्यात पारडी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. शहरासह ग्रामीण भागात दुचाकी चोरी करून दहशत निर्माण करणाऱ्या वाहनचोर टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत चोरीच्या पाच महागड्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याने वाहन चोरीच्या प्रकरणात ही महत्त्वपूर्ण कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष तपास मोहीम राबविण्यात येत होती.
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे यशोधरा नगर परिसरातील मोहम्मद जसीम अली हुसैन याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत असलेल्या एका विधी संघर्षग्रस्त बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसी चौकशीदरम्यान आरोपींनी पारडीसह शहर आणि ग्रामीण भागातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या पाच महागड्या मोटारसायकली जप्त केल्या.
जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचे सांगितले जात असून या कारवाईमुळे वाहन चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या पारडी पोलिसांकडून आरोपींची सखोल चौकशी सुरू असून या टोळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच इतर चोरीच्या घटनांशी त्यांचा संबंध आहे का याचा तपास केला जात आहे.
पारडी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाहनचोरांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनीही पोलिसांच्या कार्याचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.



