कामठीत पोलिसांची धडक कारवाई; ८६ गोवंशीय जनावरांची सुटका

नागपूरच्या कामठी परिसरातून एक मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. जुनी कामठी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ८६ गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. या जनावरांना अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीने बांधून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
२६ मे २०२६ रोजी रात्री पेट्रोलिंगदरम्यान जुनी कामठी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, कामठी परिसरातील विविध ठिकाणी गोवंशीय जनावरे अवैधरित्या कोंडून ठेवण्यात आली आहेत. या माहितीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भाजी मंडी परिसर, फम्मो शेख यांच्या रिकाम्या घरामागील जागा आणि पटेल क्लिनिकसमोरील मैदान परिसरात छापे टाकले.
या तिन्ही ठिकाणी पोलिसांना तब्बल ८६ लहान-मोठी गोवंशीय जनावरे अत्यंत क्रूरतेने आणि निर्दयपणे बांधून ठेवलेली आढळून आली. जनावरांना योग्य प्रकारे चारा आणि पाणी न देता अमानुष स्थितीत ठेवण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी तात्काळ सर्व जनावरे ताब्यात घेत सुमारे ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुटका करण्यात आलेल्या जनावरांना गोसेवा समिती आणि गोशाळेत सुरक्षित दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या संपूर्ण कारवाईत पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप पखाले, सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जुनी कामठी पोलीस, नियंत्रण कक्षातील आरसीपी पथक आणि एसआरपीएफ जवानांनी सहभाग घेतला.
सध्या आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. कामठी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गोवंश तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अवैध गोवंश तस्करी आणि प्राणी क्रूरतेविरोधात पोलिसांची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.



