प्रेमविवाहाच्या वादातून यवतमाळात युवकाची भररस्त्यात हत्या; शहरात खळबळ

यवतमाळ शहरातून एक धक्कादायक आणि रक्तरंजित घटना समोर आली आहे. प्रेमविवाहाच्या वादातून एका युवकाची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.
यवतमाळ शहरातील आर्णी रोड परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास हा थरार घडला. मृतकाचे नाव सैय्यद वसिम सैय्यद हबीब ऊर्फ मिठा चावल असे असून तो व्यवसायाने ऑटो रिक्षा चालक होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाचा भाऊ सैय्यद शहेबाज याने तीन वर्षांपूर्वी स्वाती कनाके हिच्यासोबत आंतरधर्मीय प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर तिचे नाव सैय्यद जोया असे ठेवण्यात आले होते. मात्र या प्रेमविवाहाचा राग स्वातीच्या माहेरच्यांच्या मनात कायम असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातून दोन्ही कुटुंबांमध्ये सतत वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, १३ मे रोजी स्वातीच्या नातेवाईकांच्या घरातील लग्नसमारंभात तिच्या सासरच्या मंडळींना बोलावण्यात आले नव्हते. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा वाद वाढल्याची माहिती आहे.
मंगळवारी सैय्यद वसिम याच्यावर भररस्त्यात धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. त्याला बेदम मारहाण करण्यात आली तसेच छाती, पोट आणि तोंडावर वार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सैय्यद वसिम हा रक्ताच्या थारोळ्यात फुटपाथवर पडलेला होता.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमी अवस्थेतील वसिम याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
प्रेमविवाहाच्या वादातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे यवतमाळ शहर हादरले असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.



