अमरावती शहरात प्रतिबंधात्मक कलम ३७ लागू; १० जूनपर्यंत आदेश कायम

अमरावती शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार प्रतिबंधात्मक कलम ३७ (१) आणि ३७ (३) लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.
पोलीस आयुक्तालयाच्या संपूर्ण परिक्षेत्रात हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून आज, २७ मेपासून ते १० जून २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.
या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल अशा प्रकारच्या हालचालींवर निर्बंध राहणार असून नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.



