वणीत भरदिवसा चोरी; अंगावर घाण टाकून 50 हजारांची पिशवी लंपास

यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातून एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. भरदिवसा गजबजलेल्या गांधी चौकात चोरट्यांनी एका नागरिकाच्या अंगावर घाण टाकून त्याचे लक्ष विचलित केले आणि दुचाकीला अडकवलेली तब्बल 50 हजार रुपयांची पिशवी लंपास केली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
वणी शहरातील गांधी चौक परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, लालगुडा येथील शंकर धोटे यांनी वणी येथील स्टेट बँकेतून खरेदीसाठी 50 हजार रुपये काढले होते. ही रक्कम त्यांनी एका पिशवीत ठेवून ती आपल्या दुचाकीच्या हँडलला अडकवली होती.
मात्र बँकेपासूनच काही चोरटे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शंकर धोटे गांधी चौक परिसरात पोहोचताच चोरट्यांनी एक शक्कल लढवली. त्यांच्या अंगावर मुद्दाम घाण टाकण्यात आली. अचानक अंगावर घाण पडल्याने धोटे हे देवडे यांच्या किराणा दुकानाजवळ थांबले आणि कपडे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू लागले.
याच क्षणाची वाट पाहत असलेल्या चोरट्याने दुचाकीच्या हँडलला लटकवलेली पैशांची पिशवी क्षणार्धात उचलली आणि घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे.
फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून लवकरच चोरट्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर अधिक सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
अंगावर घाण टाकून लक्ष विचलित करणे आणि पैसे लंपास करणे ही चोरट्यांची जुनी पण धोकादायक पद्धत पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यामुळे बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.



