मेळघाटातील बारू तलाव दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह; निकृष्ट काम आणि अनुपस्थित अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांचा आरोप

मेळघाटातील धारणी तालुक्यात उपविभागीय जलसंधारण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बारू गावातील फुटलेल्या तलावाच्या दुरुस्ती कामात निकृष्ट दर्जाचा वापर होत असल्याचा आरोप ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केला आहे. यासोबतच कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
धारणी तालुक्यातील बारू गावात मागील वर्षी तलाव फुटल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर तलाव दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, तलावाच्या गेट परिसरात दगड आणि मुरूम वापरण्याऐवजी थेट तलावातील गाळाचा वापर करण्यात येत आहे.
तसेच कालव्यालगतचे रपटे उखडलेल्या अवस्थेत असून त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि झुडपे साचलेली असून स्वच्छतेची कोणतीही कामे करण्यात आली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, तलाव फुटल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
याशिवाय धारणी येथील उपविभागीय जलसंधारण कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याचाही आरोप करण्यात येत आहे. आजही कार्यालयात अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचे चित्र समोर आल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांनी आणि शेतकरी बांधवांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच रखडलेली भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी केली आहे.
बारू तलाव दुरुस्तीतील कथित अनियमितता, रखडलेली भरपाई आणि कार्यालयीन कामकाजावरील प्रश्नांमुळे प्रशासनासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. आता जिल्हा प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



