माहूरमध्ये मॉर्निंग वॉकदरम्यान भरधाव कारची धडक; 60 वर्षीय भारत बेहेरे यांचा जागीच मृत्यू

माहूर शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हळहळ व्यक्त करणारी घटना समोर आली आहे. दररोजप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 60 वर्षीय भारत बेहेरे यांचा भरधाव कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे माहूर शहरात शोककळा पसरली आहे.
माहूर शहरातील कपिलेश्वर धर्मशाळेचे संचालक भारत बेहेरे, वय 60 वर्ष, हे दररोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जात असत. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे फेरफटका मारून परतत होते.
याच दरम्यान हॉटेल षडाननसमोर औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिशोर येथून माहूर दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या क्रेटा कारने त्यांना मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की भारत बेहेरे रस्त्यावर कोसळले आणि काही फूट फरफटत गेले.
या अपघातात त्यांच्या डोक्याला, तोंडाला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि जखमी भारत बेहेरे यांना त्याच वाहनातून माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर पोलिसांनी वाहन चालक धनाजी ज्ञानेश्वर देव, वय 30 वर्ष, याला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके, पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव आणि त्यांच्या पथकाकडून केला जात आहे.
भारत बेहेरे हे माहूर शहरात मनमिळाऊ आणि सामाजिक कार्यात सक्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
एका क्षणात घडलेल्या या दुर्दैवी अपघाताने माहूर शहराने एक लोकप्रिय आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व गमावले आहे. या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



