भोकरदन तालुक्यात बससेवेचा बोजवारा; ५५ क्षमतेच्या बसमध्ये तब्बल १२० प्रवाशांचा जीवघेणा प्रवास

भोकरदन तालुक्यातील धावडा-वालसावंगी-भोकरदन मार्गावरील बससेवेचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. अवघ्या ५५ प्रवाशांची क्षमता असलेल्या बसमध्ये तब्बल १२० च्या आसपास प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
धावडा मार्गे भोकरदनकडे जाणाऱ्या बसमध्ये दररोज प्रचंड गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळी नऊच्या सुमारास धावडा-वालसावंगी-भोकरदन मार्गावरील बसमध्ये विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांची मोठी गर्दी होती.
सुमारे ५५ प्रवाशांची क्षमता असलेल्या बसमध्ये तब्बल १२० च्या आसपास प्रवासी कोंबून प्रवास करत असल्याने अनेकांना उभ्यानेच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे ७० ते ८० वर्षांच्या वृद्ध महिलांनाही उभे राहून प्रवास करावा लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
या मार्गावर दुसरी बस उपलब्ध नसल्याने नागरिकांना नाईलाजाने जीव धोक्यात घालून गर्दीच्या बसमध्ये प्रवास करावा लागत असल्याची माहिती नियमित प्रवासी आणि विद्यार्थ्यांनी दिली. दररोज अशीच परिस्थिती निर्माण होत असून प्रशासनाकडून मात्र या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची बाजारपेठेतील कामे तसेच ज्येष्ठ नागरिकांची शासकीय कार्यालयातील कामे यासाठी भोकरदनला ये-जा करणे अत्यावश्यक असते. मात्र अपुऱ्या बससेवेअभावी नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
दरम्यान, नागरिकांनी मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन धावडा ते भोकरदन मार्गावर अतिरिक्त डबल बस सुरू करण्यासाठी संबंधित आगार प्रमुखांना निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते सोमनाथ आप्पा घोडके यांनी देखील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आता अतिरिक्त बसची मागणी कधी पूर्ण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



