citynewsLatest NewsMaharashtra

राज्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – मंत्री छगन भुजबळ

मुंबई : राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी भीतीपोटी अनावश्यक इंधन खरेदी आणि साठवणूक टाळावी, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात नेहमीपेक्षा तब्बल २० टक्के अधिक पेट्रोल-डिझेल विक्री झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

माध्यमांशी संवाद साधताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये काही प्रमाणात चढ-उतार होत आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

भुजबळ यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची पेट्रोल किंवा डिझेल टंचाई नाही. केंद्र आणि राज्य शासनाकडे पुरेशा प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असून नागरिकांना नियमित पुरवठा करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी नागरिकांनी गरजेपेक्षा अधिक प्रमाणात इंधन खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे २० टक्के अधिक पेट्रोल-डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली.

“भीतीपोटी अतिरिक्त साठवणूक केल्यास कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मंत्री भुजबळ यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतील गेल्या काही दिवसांमधील इंधन विक्रीची आकडेवारीही माध्यमांसमोर मांडली. प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून इंधन पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button