बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाई गंभीर; सातव्या दिवशीही पेट्रोल पंपांवर रांगा कायम

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, जानेफळ, चिखली, साखरखेर्डा, देऊळगाव राजा, मलकापूर आणि मोताळा परिसरात इंधन टंचाईचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून अनेक भागांत परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे.
जिल्ह्यात सलग सातव्या दिवशीही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. काही पेट्रोल पंपांवर मर्यादित प्रमाणातच इंधन दिले जात असल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. अनेक ठिकाणी इंधन संपल्याचे फलक लावण्यात आले असून वाहनधारकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर हेलपाटे मारावे लागत आहेत.
डिझेल उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच नागरिक आणि शेतकरी कॅनी घेऊन थेट पेट्रोल पंपांकडे धावत असल्याचे दृश्य सध्या जिल्हाभर पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पहाटेपासूनच रांगा लागतात, तर अनेकांना दिवसभर प्रतीक्षा करूनही इंधन मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
या इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना शेती मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र डिझेलअभावी ट्रॅक्टर, पंपसेट आणि शेतीसाठी वापरण्यात येणारी इंजिने बंद पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अनेक शेतकऱ्यांना शेतीची नियोजित कामे थांबवावी लागत असून पेरणीपूर्व तयारीवर याचा थेट परिणाम होत आहे. वेळेवर मशागत न झाल्यास आगामी हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नागरिक आणि शेतकरी प्रशासनाकडे तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत आहेत. सातत्याने वाढणाऱ्या रांगा, मर्यादित पुरवठा आणि वाढती गैरसोय यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील या इंधन संकटामुळे दैनंदिन जीवन आणि शेती व्यवस्था दोन्ही विस्कळीत होताना दिसत आहेत. आता प्रशासन या गंभीर परिस्थितीवर कितपत लवकर तोडगा काढते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



