citynewsLatest NewsMaharashtraPune

पुण्यात मोतीबिंदूच्या ऑपरेशनदरम्यान ६ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; कुटुंबीयांचे रुग्णालयावर गंभीर आरोप

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान ६ वर्षीय प्रियांशी बागडे हिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोळ्यांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ऑपरेशनदरम्यान तिचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांशी बागडे हिला डोळ्यांच्या मोतीबिंदूच्या उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया नियमित पद्धतीने पार पडेल, अशी अपेक्षा कुटुंबीयांना होती. मात्र उपचार सुरू असतानाच तिची प्रकृती अचानक बिघडली आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही तिचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त करत उपचार प्रक्रियेत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केला आहे. “माझी मुलगी घरातून हसत-खेळत गेली होती. तिला कोणताही गंभीर आजार नव्हता. फक्त डोळ्यांचं ऑपरेशन होतं. असा प्रकार दुसऱ्या कुणाच्या मुलीसोबत घडू नये,” अशी भावनिक प्रतिक्रिया प्रियांशीच्या वडिलांनी दिली.

या घटनेमुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नातेवाईकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, रुग्णालय प्रशासनाकडून या घटनेबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नसल्याची माहिती आहे. मृत्यूचे नेमके कारण काय, उपचारादरम्यान कोणती गुंतागुंत निर्माण झाली, याबाबत वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्टता येणार आहे.

या घटनेमुळे वैद्यकीय उपचारांदरम्यान रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button