“यूएईतील बरका अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला; जनरेटरला आग”

संयुक्त अरब अमिरातीतील बरका अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यानंतर वीज जनरेटरला आग लागली असून प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती दिली आहे.
यूएईमधील अल-अफ्रा प्रदेशातील बरका अणुऊर्जा प्रकल्पाबाहेरील पॉवर जनरेटरवर ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यानंतर जनरेटरला आग लागली असून अबू धाबी प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
अबू धाबी मीडिया ऑफिसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर माहिती देताना सांगितले की, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि किरणोत्सर्गी सुरक्षिततेवर कोणताही परिणाम झालेला नाही.
संघीय अणुऊर्जा नियामक प्राधिकरणानेही स्पष्ट केले की, आगीमुळे अणुऊर्जा प्रकल्पाच्या महत्त्वाच्या प्रणालींवर कोणताही परिणाम झालेला नाही. प्रकल्पातील सर्व युनिट्स सुरळीतपणे कार्यरत आहेत.
दरम्यान, या हल्ल्यामागे नेमके कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर यूएईवर याआधीही ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले झाले आहेत.
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत माहितीकडेच लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेनंतर मध्यपूर्वेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर या हल्ल्याकडे गंभीरतेने पाहिले जात आहे.



