AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत परिचारिकेच्या विनयभंग प्रकरणावरून संताप; न्यायाच्या मागणीसाठी परिचारिका संघटनेचे बेमुदत कामबंद आंदोलन

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेवर झालेल्या कथित विनयभंग प्रकरणामुळे अमरावतीत मोठा वाद निर्माण झाला आहे. संबंधित परिचारिकेने ७ मे रोजी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र १४ मेपर्यंत या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, शाखा अमरावती आक्रमक झाली असून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी १६ मेपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

परिचारिका संघटनेच्या आंदोलनामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्यसेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रुग्णसेवेवर परिणाम झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा संघटनेने दिला आहे.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. तक्रार दाखल होऊनही कारवाई होत नसल्याने परिचारिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणात तातडीने न्याय मिळाला नाही तर आंदोलन केवळ अमरावतीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र करण्यात येईल, असा इशाराही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे.

या प्रकरणामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन आणि पोलिसांकडून त्वरित कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button