BhandaracitynewsLatest NewsMaharashtra

भंडाऱ्यात काँग्रेसचे जलसमाधी आंदोलन; खासदार प्रशांत पडोळे, आमदार नाना पटोले यांच्यासह शेकडो शेतकरी पाण्यात उतरले

भंडारा : जिल्ह्यातील कारधा चौकात आज काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन छेडण्यात आले. “जलसमाधी आंदोलन” करत शेकडो शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट पुलाखालील पाण्यात उतरून सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.

या आंदोलनात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे, आमदार तथा प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाना पटोले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.

कारधा चौकातील लहान पुलावरून आंदोलनकर्ते थेट पाण्यात उतरले आणि “शेतकऱ्यांचा हक्क मिळाल्याशिवाय माघार नाही”, “सरकार शेतकरीविरोधी आहे” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आणि शासनाच्या कथित दुर्लक्षाविरोधात हे आंदोलन करण्यात आले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे कारधा परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या आंदोलनामुळे भंडारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button