काल धुळीच्या वादळाने धुमाकूळ… आज राज्यातील १५ पेक्षा अधिक जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा
राज्यातील हवामानात सध्या मोठे बदल पाहायला मिळत असून, एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे वादळी पाऊस आणि धुळीची वादळं अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. काल अनेक भागांत धुळीच्या वादळाने अक्षरशः धुमाकूळ घातल्यानंतर आता हवामान विभागाने राज्यातील १५ पेक्षा अधिक जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काल राज्यातील अनेक शहरांमध्ये धुळीच्या वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे रस्त्यांवर धुळीचे प्रचंड लोट पसरले होते. काही भागांमध्ये झाडं कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि वाहतुकीवर परिणाम झाल्याच्या घटनाही समोर आल्या. काही जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊसही झाला होता.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे थंड वारे भारताच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार होत असून, अनेक भागांत पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी विदर्भात तापमानाने ४५ अंशांच्या जवळ पोहोचत उष्णतेचा कडाका वाढला होता. मात्र आता त्याच विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याने हवामानात मोठा बदल झाल्याचं दिसून येत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, १० मेनंतर उत्तर-पश्चिम भारतात अँटी सायक्लोनची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजस्थान, गुजरात तसेच महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.
दुसरीकडे, सध्याच्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक भागांत काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. फळबागा, भाजीपाला आणि साठवलेल्या धान्यालाही या अवकाळी हवामानाचा फटका बसू शकतो.
कोकण किनारपट्टीवरील काही जिल्ह्यांसाठी मात्र उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात एकाचवेळी पाऊस आणि उष्णतेचा तडाखा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, वादळी वाऱ्यांदरम्यान सुरक्षित ठिकाणी राहावे तसेच शेतकऱ्यांनी पिकांची योग्य काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.



