AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; प्रभाग 16 मधील नागरिक त्रस्त, आंदोलनाचा इशारा

अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहरात स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. तुंबलेले नाले, साचलेला कचरा आणि वाढती दुर्गंधी यामुळे परिसरातील परिस्थिती भयावह बनली आहे. रोशन नगर ते अलीम नगरपर्यंत अनेक भागात महिनोनमहिने साफसफाईच न झाल्याने नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

प्रभाग क्रमांक 16 अंतर्गत येणाऱ्या रोशन नगर, रहिमत नगर, जावेद नगर, कलीम नगर, मुस्तफा नगर, हैदरपुर, अलीम नगर आणि मुजफ्फरनगर या भागांमध्ये सध्या अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नाल्यांमध्ये साचलेलं घाण पाणी आणि कचऱ्याचे ढिगारे यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.

स्थानिकांच्या मते, गेल्या अनेक महिन्यांपासून नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही. परिणामी नाले तुडुंब भरले असून सांडपाणी रस्त्यावर येत आहे. या अस्वच्छतेचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून डासांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

परिसरात डेंगू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

नागरिकांनी अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाकडून केवळ आश्वासनं दिली जात आहेत, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून नाले साफ करण्यात आले नाहीत, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या

  • तात्काळ नाल्यांची साफसफाई करण्यात यावी
  • परिसरातील कचरा त्वरित हटवावा
  • नियमित फॉगिंग आणि औषध फवारणी करावी
  • डेंगू-मलेरिया प्रतिबंधासाठी विशेष मोहीम राबवावी
  • स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी

अमरावती शहरातील वाढती अस्वच्छता आणि प्रशासनाची कथित निष्क्रियता यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. आता प्रशासन यावर कितपत तातडीने उपाययोजना करतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button