‘प्रत्येक सहावा भाजप खासदार ‘व्होट चोरी’तून जिंकला’; राहुल गांधींचा भाजपवर घणाघात

नवी दिल्ली | प्रतिनिधी
लोकसभेतील भाजप खासदारांच्या वैधतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “लोकसभेतील भाजपच्या प्रत्येक सहाव्या खासदाराचा विजय ‘व्होट चोरी’मुळे झाला आहे,” असा गंभीर आरोप करत राहुल गांधी यांनी भाजपच्या खासदारांना त्यांच्या भाषेतच “घुसपैठिया” म्हणायचं का? असा सवाल उपस्थित केला.
राहुल गांधी यांनी बुधवारी (6 मे) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर हिंदीत पोस्ट करत भाजपवर थेट निशाणा साधला.
“व्होट चोरी करून कधी एखादी जागा चोरली जाते, तर कधी संपूर्ण सरकारच चोरलं जातं. लोकसभेतील भाजपच्या 240 खासदारांपैकी साधारण प्रत्येक सहावा खासदार ‘व्होट चोरी’तून निवडून आला आहे,” असा आरोप राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये केला.
भाजपच्या निवडणूक विजयाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी या वक्तव्यातून निवडणूक प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला आहे. “भाजपच्या भाषेत अशा खासदारांना ‘घुसपैठिया’ म्हणायचं का?” असा टोला लगावत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर राजकीय पलटवार केला.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर देशाच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत राहुल गांधी यांनी भाजपच्या विजयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने या वक्तव्यावर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम, मतदान प्रक्रिया आणि मतमोजणीवरून विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असताना राहुल गांधी यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हं दिसत आहेत.



