Amaravti GramincitynewsLatest NewsMaharashtraMorsi Warud

पूर रोखण्यासाठी भिंत की नव्या संकटाची चाहूल? मोर्शीत दमयंती नदीवरील कामावरून नागरिक आक्रमक

मोर्शी | प्रतिनिधी
पूरस्थिती टाळण्यासाठी उभारली जात असलेली संरक्षण भिंतच आता भविष्यातील नव्या संकटाचं कारण ठरणार का, असा गंभीर सवाल मोर्शी शहरात उपस्थित होत आहे. मोर्शीतील पेठपुरा परिसरात दमयंती नदीवर सुरू असलेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकामावरून मोठा वाद निर्माण झाला असून, स्थानिक नागरिकांनी या कामाच्या दर्जावर आणि पद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत.

2019 मध्ये दमयंती नदीला आलेल्या महापुरामुळे पेठपुरा परिसरात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, मालमत्तेचं नुकसान झालं आणि नागरिकांना मोठा फटका बसला होता. याच पार्श्वभूमीवर भविष्यात पूरस्थिती टाळण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकारातून सुमारे 9 कोटी रुपयांच्या निधीतून पूल आणि संरक्षण भिंतीचं काम मंजूर करण्यात आलं होतं.

सध्या या संरक्षण भिंतीचं बांधकाम सुरू असलं, तरी या कामावर स्थानिक नागरिकांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. नागरिकांच्या मते, संरक्षण भिंत निकृष्ट दर्जाची उभारली जात असून, कामात तांत्रिक निकष पाळले जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सर्वात गंभीर आरोप म्हणजे, ही भिंत नदीपात्राच्या बाहेर बांधली जाणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात नदीच्या मध्यभागातच बांधकाम केलं जात असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह अरुंद होत असून, नदीचं पात्र कमी केलं जात आहे. परिणामी दमयंती नदीचं रूपांतर हळूहळू नाल्यासारखं होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे.

नागरिकांच्या मते, नदीचा व्यास कमी झाल्यास पाण्याचा वेग आणि दाब वाढून भविष्यात पूरस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. पूर टाळण्यासाठी सुरू करण्यात आलेलं हे कामच उलट पूराचा धोका वाढवणार ठरू शकतं, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

“ही भिंत चुकीच्या पद्धतीने बांधली जात आहे. नदीपात्रातच काम केल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडतोय. भविष्यात यामुळे पूरस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन या कामाची चौकशी करावी आणि आवश्यक दुरुस्ती करावी,” अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून कामाची तांत्रिक चौकशी करावी, निकृष्ट कामावर कारवाई करावी आणि योग्य सुधारणा कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

मोर्शीतील दमयंती नदीवरील संरक्षण भिंतीचं हे काम आता विकासाचा भाग ठरणार की भविष्यातील नव्या संकटाची नांदी, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेतं आणि नागरिकांच्या तक्रारींवर काय निर्णय घेतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button