citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraPune

पुण्यात संतापजनक प्रकार! सुट्टीसाठी आलेल्या 7 वर्षीय नातीवर सख्ख्या आजोबाचा अत्याचाराचा प्रयत्न; संतप्त नागरिकांकडून चोप

पुण्यातील पर्वती परिसरातून नातेसंबंधालाच काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजोबांकडे आलेल्या अवघ्या 7 वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच सख्ख्या 50 वर्षीय आजोबाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

ही घटना पर्वती भागातील जनता वसाहत परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आईसोबत आजोबांच्या घरी आली होती. घटना घडली तेव्हा मुलगी घरात एकटी होती. याच वेळी आरोपी आजोबाने दारूच्या नशेत मुलीचे कपडे काढून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

मात्र, प्रसंगावधान राखत चिमुरडीने आरडाओरडा केल्याने हा प्रकार उघड झाला.
दरम्यान, शेजारी राहणाऱ्या एका महिलेने घराच्या पत्र्यातून डोकावून पाहिले असता तिला घरातील धक्कादायक प्रकार दिसला. आरोपीने मुलीला माळ्यावर लपवण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

महिलेने तात्काळ आरडाओरडा करत शेजाऱ्यांना बोलावले. आवाज ऐकून परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. संतप्त नागरिकांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि मुलीला सुरक्षित बाहेर काढले. पीडित चिमुरडीने घडलेला प्रकार सांगताच संतप्त जमावाने आरोपीला पकडून चोप दिला.

घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले.
परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि मोठा बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ पर्वती परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत मोर्चा काढला.
पीडित मुलीच्या आईने आरोपीविरुद्ध अधिकृत फिर्याद दिली असून, या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पुण्यातील नसरापूरसारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, समाजात वाढत्या विकृत मानसिकतेविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button