नागपुरात ‘ऑपरेशन थंडर 2.0’ची धडक; गांजा तस्करीचा भंडाफोड, तिघे अटकेत

नागपूर शहरात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजा तस्करीच्या रॅकेटला मोठा धक्का दिला आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक ०४ ने ‘ऑपरेशन थंडर 2.0’ अंतर्गत धडक कारवाई करत सक्करदरा पोलीस ठाणे हद्दीतील आशीर्वाद नगर परिसरात गांजा तस्करीचा भंडाफोड केला.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयितांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान आरोपींकडून मोठ्या प्रमाणात गांजा, रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी मोहम्मद समीर मोहम्मद वझीरउदीन (हैद्राबाद), शेख मोहम्मद शेख अब्दुल (मुंबई) आणि मोहम्मद अकबर बाबा मोहम्मद सखर (हैद्राबाद) या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून ४ किलो ३६५ ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत १ लाख ९ हजार १२५ रुपये आहे. याशिवाय ४ हजार रुपये रोख रक्कम आणि ४ अँड्रॉइड मोबाईल, अशी एकूण १ लाख ५४ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई एनडीपीएस कायद्यांतर्गत करण्यात आली असून आरोपींना वैद्यकीय तपासणीनंतर अटक करून पुढील कारवाईसाठी सक्करदरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.
नागपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या रॅकेटला मोठा धक्का बसला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास आता अधिक खोलवर सुरू असून आणखी मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



