तमिळनाडूत ‘थलपती’चा राजकीय उदय! विजय ठरणार नवा गेमचेंजर?

चेन्नई : तमिळनाडूच्या राजकारणात दशकानुदशके सुरू असलेलं DMK विरुद्ध AIADMK हे द्वंद्व आता तुटण्याच्या उंबरठ्यावर दिसत आहे. अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे विजय थलपती आता तमिळनाडूच्या राजकारणातील नवे केंद्रबिंदू ठरत असून, त्यांच्या तमिळ वेत्री कळगम (TVK) पक्षाने राज्याच्या राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये तमिळनाडूत सर्वाधिक चर्चा विजय यांच्या उदयानं रंगली आहे. सुरुवातीच्या कलांनुसार विजय यांचा TVK पक्ष 234 पैकी 100 हून अधिक जागांवर आघाडीवर असून, तमिळनाडूच्या सत्तासमीकरणात तो निर्णायक शक्ती म्हणून उदयास येताना दिसत आहे.
तमिळनाडू विधानसभेतील बहुमताचा आकडा 118 आहे. TVK ने शंभरी पार केली असली तरी स्पष्ट बहुमतासाठी अजून काही जागांची गरज आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पक्षाने थेट सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचणं, हा तमिळनाडूच्या राजकारणातील ऐतिहासिक बदल मानला जात आहे.
सुपरस्टार ते सत्तेचा दावेदार
सुमारे 33 वर्षे तमिळ चित्रपटसृष्टीत सुपरस्टार म्हणून राज्य करणाऱ्या विजय यांनी 2024 मध्ये तमिळ वेत्री कळगम (TVK) पक्षाची स्थापना केली. अभिनय कारकिर्दीच्या शिखरावर असतानाच त्यांनी राजकारणात उडी घेतली आणि अवघ्या दोन वर्षांत मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत पोहोचले.
राजकारणात प्रवेश करताना विजय यांनी स्वतःला केवळ अभिनेता नव्हे, तर “जनतेसाठी करिअरचा सर्वोत्तम काळ सोडणारा नेता” अशी प्रतिमा दिली. हाच संदेश त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरला.
होलोग्राम, सोशल मीडिया आणि ‘सीटी’चं राजकारण
विजय यांच्या प्रचाराची सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या आधुनिक आणि आक्रमक प्रचारशैलीमुळे.
होलोग्राम तंत्रज्ञान, सोशल मीडिया, व्हायरल गाणी, रोबोटिक कॅम्पेन आणि डिजिटल रणनीती यांचा प्रभावी वापर करत त्यांनी पारंपरिक प्रचाराला नव्या युगाची जोड दिली.
त्यांचं ‘सीटी’ हे निवडणूक चिन्ह राज्यभरात लोकप्रिय ठरलं. गावोगावी समर्थक सीटी वाजवत विजय यांच्या समर्थनात उभे राहिले. त्यांच्या प्रचारगीताला यूट्यूबवर कोट्यवधी व्ह्यूज मिळाल्याने तरुण मतदारांमध्ये TVK ची लाट निर्माण झाली.
फॅन क्लब ते राजकीय संघटन
विजय यांची सर्वात मोठी ताकद ठरली ती त्यांची वर्षानुवर्षे उभी असलेली फॅन क्लब नेटवर्क.
हीच फॅन फोर्स पुढे TVK ची संघटनात्मक ताकद बनली. गावागावांत कार्यकर्ते, सोशल मीडिया मोहीम, प्रचार यंत्रणा आणि जनसंपर्क या सगळ्याचा मजबूत पाया याच नेटवर्कमधून उभा राहिला.
तरुण आणि महिलांचा मोठा पाठिंबा
राजकीय विश्लेषकांच्या मते, विजय यांना सर्वाधिक पाठिंबा तरुण आणि महिला मतदारांकडून मिळताना दिसत आहे.
पारंपरिक पक्षांपासून दूर जाणाऱ्या नवमतदारांनी TVK कडे पर्याय म्हणून पाहिलं.
महिलांसाठी मासिक आर्थिक मदत, मोफत गॅस सिलिंडर, विवाह सहाय्य, शिक्षणासाठी कर्ज, तर शेतकरी आणि मच्छीमारांसाठी स्वतंत्र योजना अशा लोकाभिमुख घोषणांनी TVK चा जाहीरनामा लक्षवेधी ठरला.
DMK-AIADMKच्या दशकांतील वर्चस्वाला धक्का
तमिळनाडूच्या राजकारणात गेल्या पाच दशकांपासून DMK आणि AIADMK यांचंच वर्चस्व राहिलं. मात्र TVK च्या उदयानं हा ‘द्रविडियन बायनरी’ मोडण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. TVK सध्या सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येताना दिसत असून DMK तिसऱ्या क्रमांकावर घसरल्याचं चित्र सुरुवातीच्या कलांमध्ये दिसत आहे.
सर्वात मोठा प्रश्न… विजय मुख्यमंत्री होणार?
सध्याच्या कलांनुसार विजय यांचा TVK हा तमिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत असला, तरी स्पष्ट बहुमताचा टप्पा गाठणं निर्णायक ठरणार आहे. जर TVK बहुमताचा आकडा पार करते किंवा सत्तेसाठी आवश्यक पाठिंबा मिळवते, तर विजय थेट मुख्यमंत्रीपदाच्या दिशेने वाटचाल करतील.
तमिळनाडूच्या जनतेनं बदलाचा स्पष्ट संदेश दिला आहे.
आता फक्त एकच प्रश्न उरतो—
चित्रपटसृष्टीतील ‘थलपती’… राजकारणातही खरा ‘जननायक’ ठरणार का?



