दिल्लीत भीषण आग! 4 मजली इमारतीत 9 जणांचा मृत्यू, लहान बाळाचाही समावेश

दिल्लीतील शाहदरा परिसरातील विवेक विहार येथे रविवारी पहाटे एक भीषण आग लागल्याची घटना घडली. चार मजली निवासी इमारतीत लागलेल्या या आगीत एकूण 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 4 पुरुष, 4 महिला आणि दीड वर्षांच्या लहान बाळाचाही समावेश आहे.
दिल्ली अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, पहाटे सुमारे 3.47 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तत्काळ घटनास्थळी पथक दाखल झाले. जवळपास 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी सुमारे 8 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या दरम्यान, इमारतीत अडकलेल्या 10 ते 15 लोकांची सुटका करण्यात आली. त्यापैकी 2 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृतांचे मृतदेह इमारतीच्या वेगवेगळ्या मजल्यांवरून बाहेर काढण्यात आले. स्थानिक नगरसेवक पंकज लुथरा यांनी सांगितले की, काही मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. त्यामुळे मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काहींच्या मते शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, तर स्थानिकांनी एसीमध्ये स्फोट झाल्यानंतर आग पसरल्याचा दावा केला आहे. अधिकाऱ्यांकडून याबाबत सखोल चौकशी सुरू असून लवकरच खरे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.



