‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून बुलढाण्यात वाद चिघळला; वाचन आंदोलन, पोलिस कारवाईनंतर राज्यभर तणाव

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या एकच विषय चर्चेत आहे — ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून राज्यात मोठा वाद पेटला असून, बुलढाण्यात या वादाने उग्र रूप धारण केले आहे. वाचन आंदोलन, पोलिसांची कारवाई आणि शेकडो कार्यकर्त्यांची धरपकड यामुळे बुलढाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
बुलढाणा शहरात ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून निर्माण झालेला वाद आता राज्यभर पसरला आहे. या वादाची ठिणगी पडली ती एका कथित व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे. या ऑडिओ क्लिपमध्ये बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्याशी वादग्रस्त भाषेत संवाद साधल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या कथित संभाषणानंतर वातावरण चिघळले आणि प्रकाशक प्रशांत आंबी यांनी हजारो कार्यकर्त्यांसह आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्धार जाहीर केला. मात्र, आंदोलनाला सुरुवात होण्याआधीच पोलिसांनी कडक भूमिका घेत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचेही चित्र समोर आले. आंदोलकांना जबरदस्तीने पोलीस वाहनात बसवतानाचे दृश्यही समोर आल्याने वातावरण आणखी तापले.
दरम्यान, कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या पुस्तकाच्या समर्थनार्थ वाचन आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात राज्यभरातून कार्यकर्ते सहभागी झाले होते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीच कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले की, परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी कायद्याचा सन्मान केला, मात्र आंदोलनकर्त्यांनी नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. तसेच त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही.”
दरम्यान, या पुस्तकाच्या नावावरूनही राजकीय वाद तीव्र झाला आहे. शिंदे गटाकडून पुस्तकाचे नाव बदलण्याची मागणी करण्यात येत आहे, तर दुसरीकडे कम्युनिस्ट पक्षाकडून आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
विशेष म्हणजे, ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांनी लिहिले असून, त्याची पहिली आवृत्ती १९८७ साली प्रकाशित झाली होती. आजपर्यंत या पुस्तकाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या असून, विविध स्तरांवर या पुस्तकावर चर्चा होत आली आहे.
मात्र, सध्याच्या वादामुळे बुलढाणा जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून पेटलेला हा वाद आता केवळ बुलढाण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



