citynewsJalnaLatest NewsMaharashtra

जालन्यात हृदयद्रावक आग! भोकरदन तालुक्यात गोठा जळून खाक; चार जनावरांचा होरपळून मृत्यू

जालन्यातील भोकरदन तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. धावडा गावातील शेतातील गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत चार जनावरांचा होरपळून मृत्यू झाला असून, एक जनावर गंभीर जखमी झाले आहे. या आगीत शेजारील ऊस शेतीही जळून खाक झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

जालन्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावात दुपारच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. तुकाराम शिवाजी देवकर यांच्या गट क्रमांक 805 मधील शेतातील गोठ्याला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण करत संपूर्ण गोठ्याला वेढा घातला.

आगीच्या ज्वाळा इतक्या तीव्र होत्या की, शेजारील बाळाराम बोरमळे यांच्या सुमारे एक एकर ऊस शेतीलाही या आगीने आपल्या विळख्यात घेतले. काही क्षणांतच संपूर्ण परिसर धुराच्या लोटांनी व्यापला गेला.

घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात धूर निघताना दिसताच ग्रामस्थ आणि शेजारील शेतकऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. विद्युत पंपाच्या मदतीने आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. मात्र, तोपर्यंत आग प्रचंड भडकली होती आणि मोठे नुकसान झाले.

या भीषण आगीत दोन म्हशी, एक गाय आणि एक बैल यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर एक वासरू गंभीर जखमी झाले असून त्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

आगीत गोठ्यातील कुट्टी, भुसा आणि साठवून ठेवलेले जनावरांचे खाद्यसाहित्यही पूर्णपणे जळून खाक झाले. त्यामुळे जनावरांसह शेतीसाठी आवश्यक असलेले साहित्यही नष्ट झाल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट कोसळले आहे.

घटनेची माहिती मिळताच महसूल अधिकारी किशोर राजपूत यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेतला जात असून, शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

या दुर्घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून, आधीच उन्हाच्या तीव्रतेने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही घटना आणखी मोठा धक्का ठरली आहे.

एकीकडे वाढते तापमान, तर दुसरीकडे अशा आगीच्या दुर्घटना… शेतकऱ्यांसाठी दुहेरी संकट निर्माण करत आहेत. प्रशासनाने तात्काळ मदत करून शेतकऱ्यांना दिलासा देणे अत्यावश्यक बनले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button