अमरावतीत उष्णतेचा कहर; बडनेरा मोदी रुग्णालय उष्माघातासाठी सज्ज, तात्काळ उपचारांची व्यवस्था

अमरावतीत वाढत्या उष्णतेने नागरिकांचे हाल होत असताना आरोग्य यंत्रणा कितपत सज्ज आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच बडनेरा येथील मोदी रुग्णालयाने उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर सज्जता दाखवत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. स्वतंत्र उष्माघात कक्ष नसतानाही रुग्णांवर तात्काळ उपचार करण्याची संपूर्ण व्यवस्था रुग्णालय प्रशासनाने केली आहे.
अमरावती जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा चढत असून उष्णतेची तीव्र लाट नागरिकांना त्रस्त करत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका अधिक गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर बडनेरा येथील मोदी रुग्णालय प्रशासन सतर्क झाले असून, उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी विशेष उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
रुग्णालयात स्वतंत्र ‘हीट स्ट्रोक वॉर्ड’ नसला तरी उष्माघाताच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल होणाऱ्या उष्माघातग्रस्त रुग्णांना विलंब न करता प्राथमिक उपचार, सलाईन, शरीराचे तापमान नियंत्रण आणि आवश्यक औषधोपचार त्वरित दिले जात आहेत.
उष्माघात हा जीवघेणा ठरू शकणारा आजार असल्याने प्रत्येक रुग्णावर वेळेत उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे. याच दृष्टीने रुग्णालय प्रशासनाने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यास त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याची तयारीही पूर्ण ठेवण्यात आली आहे.
यासाठी २४ तास आपत्कालीन रुग्णवाहीका सेवा उपलब्ध ठेवण्यात आली असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना त्वरित हलविण्याची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर न पडण्याचे, भरपूर पाणी पिण्याचे, डोक्यावर टोपी किंवा कापड वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच चक्कर येणे, अंग गरम होणे, अशक्तपणा, उलट्या किंवा डोकेदुखी यांसारखी उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.
उष्णतेच्या तीव्र लाटेत आरोग्य यंत्रणेची सज्जता अत्यंत महत्त्वाची ठरत असताना, बडनेरा येथील मोदी रुग्णालय नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
उष्णतेचा वाढता प्रकोप लक्षात घेता प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असली तरी नागरिकांनीही स्वतःची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. सुरक्षित राहा, सतर्क राहा.



