Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपुरात भीषण अपघात; खड्ड्यात दुचाकी कोसळून दोन विधी विद्यार्थ्यांचा मृत्यू, एक न्यायाधीशांचा तर दुसरा वकिलाचा मुलगा

नागपूर-वर्धा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन विधी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुचाकी खोल खाणीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली असून, मदत उशिरा मिळाल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मृत विद्यार्थ्यांची नावे सक्षम बनसोड आणि आर्यन सोनटक्के अशी असून, दोघेही २१ वर्षीय होते. सक्षम हा वरिष्ठ जिल्हा न्यायाधीशांचा मुलगा होता, तर आर्यन हा वकिलाचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे नागपूरच्या विधी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सक्षम आणि आर्यन हे महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे तृतीय वर्षाचे विद्यार्थी होते. बुधवारी रात्री दोघेही डोंगरगाव परिसरात जेवणासाठी गेले होते. रात्री सुमारे १०.५० वाजता ते दुचाकीवरून परत निघाले. बुटीबोरीकडे येताना कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या मागील टी-पॉईंटजवळ अंधाऱ्या रस्त्यावर आर्यनचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट सुमारे ८५ फूट खोल खड्ड्यात कोसळले.

अपघात झालेला हा मार्ग विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांकडून शॉर्टकट म्हणून वापरला जातो. मात्र या ठिकाणी प्रकाशयोजना नसल्याने आणि इशारा फलक नसल्याने हा रस्ता अत्यंत धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. अंधारामुळे विद्यार्थ्यांना पुढे खोल खड्डा असल्याचे दिसले नसावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ही दुर्घटना रात्रीच घडली, मात्र दोघांचा शोध लागण्यास अनेक तास लागले. आर्यनचा मोबाईल जेवणाच्या हॉटेलमध्येच राहिला होता. मध्यरात्रीनंतर हॉटेल व्यवस्थापकाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. मित्र, वॉर्डन आणि विद्यापीठ प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. मात्र गुरुवारी सकाळी एका नागरिकाला खड्ड्यात दोघांचे मृतदेह दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

बुटीबोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एम्स रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने गुरुवारी सुट्टी जाहीर करत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button