अमरावतीतील अत्याचार प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना यांची तीव्र प्रतिक्रिया; ठोस उपाययोजनांची मागणी

अमरावती – शहरातील १८ वर्षीय युवतीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर विविध स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
रजिया सुलताना यांनी सांगितले की, अशा घटनांवर केवळ संताप व्यक्त करून थांबून चालणार नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबविणे अत्यावश्यक आहे. त्यांनी समाज, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यासच अशा गुन्ह्यांना आळा घालता येईल, असे मत व्यक्त केले.
तसेच, कायदा-सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी, महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे आणि गुन्हेगारांवर त्वरित व कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, या घटनेमुळे अमरावतीत संतापाचे वातावरण असून, पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



