रामटेकजवळ भीषण अपघात; बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, एक जखमी

रामटेक : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील मनसर-कांद्री तलाव परिसरात सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणाचे नाव नादिर खान नासीर खान (वय २३) असे असून तो आपल्या चुलत भावासोबत दुचाकीवरून प्रवास करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, नादिर खान हा पल्सर दुचाकीवरून अनवार जाफर खान याला घेऊन मनसरहून कांद्रीकडे जात असताना नागपूरकडून जबलपूरकडे जाणाऱ्या भरधाव बसने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
या धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले गेले. नादिर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अनवार खान गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह रामटेक शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. जखमी अनवार खान याच्यावर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून पसार झाला असून निष्काळजी व भरधाव वाहन चालवण्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून अज्ञात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वाहन चालवताना वेगावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे.



