नागपूर जिल्ह्यात रेल्वेखाली येऊन तरुणाचा मृत्यू; आत्महत्येची शक्यता, कन्हान परिसरात खळबळ

नागपूर (प्रतिनिधी):
नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरात एका २८ वर्षीय युवकाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा आत्महत्येचा प्रकार असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही घटना कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील कांद्री परिसरात घडली असून, मृत युवकाची ओळख राकेश देवीदीन सूर्यवंशी (वय २८) अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश हा बेरोजगार असून तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता.
गुरुवार, २६ मार्च रोजी रात्री त्याने घराजवळील मंदिरात जेवण केले होते. त्यानंतर सुमारे रात्री १० वाजताच्या सुमारास तो तेथून निघून गेला. मात्र, उशिरापर्यंत तो घरी परतला नसल्याने कुटुंबीय चिंतेत होते.
दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री रितेश सूर्यवंशी यांनी कुटुंबीयांना फोन करून राकेशने जे.एन. हॉस्पिटलसमोरील बोर्डा मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केल्याची माहिती दिली. नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता राकेशचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला.
अपघात अत्यंत भीषण होता. त्यामध्ये मृतदेहाचे शीर आणि धड वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले आढळले.
घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, मानसिक तणावामुळे असे टोकाचे निर्णय घेतले जात असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली असून, अशा परिस्थितीत कुटुंबीयांनी आणि समाजाने वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.



