Chhatrapati Sambhaji NagarLatest NewsMaharashtraSocial News

अफवांमुळे छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल पंपांवर गर्दी; पुरवठा सुरळीत असल्याचा प्रशासनाचा दावा

छत्रपती संभाजीनगर :
शहरात पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नसतानाही अफवा आणि पॅनिक बुकिंगमुळे पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी उसळल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. प्रशासनाने मात्र इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

सोशल मीडियावर पसरलेल्या अफवा आणि इराण युद्धाच्या चर्चांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी “साठा संपला” असे फलकही लावण्यात आले होते.

प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत स्पष्ट केलं आहे की, इंधनाचा कोणताही तुटवडा नाही आणि पुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही ठिकाणी वाहनांना मर्यादित प्रमाणात इंधन देण्यात येत आहे.

दरम्यान, खुलताबाद आणि वेरूळ परिसरात वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या या भागात वेरूळ लेणी, भद्रमारुती मंदिर आणि सुलीभंजन येथील दत्त मंदिरामुळे दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि भाविकांची वर्दळ असते. मात्र संपूर्ण परिसरात केवळ दोनच पेट्रोल पंप उपलब्ध आहेत. त्यापैकी एक पंप वादग्रस्त आणि अपुऱ्या सुविधांमुळे टाळला जात असल्याने सर्व भार दुसऱ्या पंपावर येत आहे, परिणामी तिथे प्रचंड गर्दी होत आहे.

या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. गहू काढणीसाठी लागणारे ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर डिझेलअभावी ठप्प पडत असल्याने शेतीकामे रखडली असून मोठ्या नुकसानाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकीकडे प्रशासनाचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा, तर दुसरीकडे नागरिकांमध्ये वाढता संभ्रम अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर विश्वास ठेवणे आणि संयम राखणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button