अमरावतीत गॅस टंचाई; सिलेंडर ब्लॅकमार्केटिंगचे आरोप, नागरिक संतप्त

अमरावती शहरात घरगुती गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई जाणवत असून, काही एजन्सीकडून ब्लॅकमार्केटिंग होत असल्याचे गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत. इराण-इजरायल युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात असताना, त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटताना दिसत आहेत.
ग्राहकांनी सिलेंडर बुकिंग केल्यानंतर मोबाईलवर ‘डिलिव्हर’ झाल्याचा मेसेज येत असला, तरी प्रत्यक्षात सिलेंडर घरी पोहोचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ५ मार्च २०२६ रोजी बुकिंग करूनही अनेकांना अद्याप सिलेंडर मिळालेला नाही, त्यामुळे घरगुती स्वयंपाकाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांना सिलेंडर मिळत नसताना काही हॉटेल्सना दररोज अवैधरित्या गॅस पुरवठा होत असल्याचा आरोप आहे. ब्लॅकमध्ये एका सिलेंडरसाठी तब्बल २००० रुपये मोजावे लागत असल्याचे ग्राहक सांगत आहेत.
विशेषतः लक्ष्मी भारत गॅस एजन्सी वर सिलेंडरच्या नावाखाली अवैध व्यवसाय सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्राहकांनी एजन्सीसमोर गर्दी करत आपला रोष व्यक्त केला.
नागरिकांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गॅस टंचाई आणि ब्लॅकमार्केटिंगमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि पुढे काय पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



