City CrimecitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीला सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; दोन आरोपी अटकेत

नागपूर शहरात सोशल मीडियाचा गैरवापर करत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फोटो मिळवले आणि त्याच आधारे पैशांसाठी दबाव टाकल्याची माहिती समोर आली आहे.

मुलीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी Snapchat आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी ओळख वाढवली. पुढे ही ओळख प्रेमसंबंधात बदलली. मात्र, विश्वास संपादन करून आरोपींनी तिचे काही फोटो मिळवले आणि त्यानंतर त्याच फोटोच्या आधारे तिला वारंवार ब्लॅकमेल करण्यात आले.

आरोपींनी मुलीवर घरातून पैसे आणण्यासाठी दबाव टाकला. काही दिवसांपासून घरातून पैसे गायब होत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर मुलीकडे चौकशी करण्यात आली आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे हिमांशु धनेंढर तोंडरे (वय २५) आणि गौरव रामदास भेंडे (वय ३२) अशी आहेत. दोघेही नागपूरचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आणखी कोणी यात सहभागी आहे का याचाही शोध पोलिस घेत आहेत. या घटनेमुळे सोशल मीडियाच्या वापराबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराचे गंभीर परिणाम काय होऊ शकतात, याचे हे उदाहरण मानले जात असून, पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे आणि मुलांनीही सजग राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button