भंडाऱ्यात धक्कादायक प्रकार, विनयभंग प्रकरणात पोलिसांवर गंभीर आरोप

भंडाऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप असतानाही पोलिसांनी सुरुवातीला फक्त एनसी दाखल केल्याचा आरोप पीडितेकडून करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे लाखनी पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी परिसरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाजन मोहल्ला परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या घरात रात्रीच्या सुमारास शेजारीच राहणारा आरोपी कुंदन गिरेपुंजे जबरदस्तीने दरवाजा तोडून आत शिरला. महिलेच्या आरोपानुसार, आरोपीने तिच्यासोबत अश्लील चाळे करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड केल्यावर तिचा पती मदतीला धावत आला. मात्र त्यानंतर आरोपीने उलट तिच्या पतीवरच हल्ला करत छाती आणि पोटावर मारहाण केल्याचा आरोप आहे. या झटापटीत घरातील लहान मुलालाही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे. घाबरलेले कुटुंब तक्रार देण्यासाठी लाखनी पोलीस स्टेशन येथे पोहोचले. मात्र एवढ्या गंभीर प्रकरणानंतरही पोलिसांनी सुरुवातीला केवळ मारहाणीची एनसी दाखल केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पीडित महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर जवळपास दहा दिवसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापही आरोपी मोकाट फिरत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यापेक्षाही गंभीर आरोप म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांकडून पीडित महिलेवर बयान बदलण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप तिने केला आहे. पीडित महिलेने स्पष्ट इशारा दिला आहे की, तिला न्याय मिळाला नाही तर ती टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पडेल. आता मोठा प्रश्न असा उभा राहतो की, एवढ्या गंभीर प्रकरणात सुरुवातीला फक्त एनसी का दाखल करण्यात आली? आरोपीला अभय देणाऱ्यांवर कारवाई होणार का? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पीडित महिलेला न्याय मिळणार का? या संपूर्ण प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



