अमरावतीत महिलांचा संताप; फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन, ड्रग्स-गांजा विक्री बंद करण्याची मागणी

अमरावती शहरातील फ्रेजरपुरा परिसरात महिलांचा संताप उफाळून आला आहे. परिसरात वाढत चाललेल्या दारू, ड्रग्स आणि गांजाच्या अवैध विक्रीमुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन छेडले. रात्री उशिरापर्यंत महिलांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देत पोलिसांकडे तातडीने कडक कारवाईची मागणी केली.
ही घटना अमरावती शहरातील फ्रेजरपुरा परिसरात घडली. परिसरात वाढत असलेल्या अवैध दारू विक्रीसह ड्रग्स आणि गांजाच्या व्यवहारांविरोधात स्थानिक महिलांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर संतप्त महिलांनी थेट फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठत आंदोलन सुरू केले.
महिलांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देत परिसरातील अवैध दारू, ड्रग्स आणि गांजाची विक्री तात्काळ बंद करण्याची जोरदार मागणी केली. या आंदोलनादरम्यान महिलांनी घोषणाबाजी करत पोलिसांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक महिलांचा आरोप आहे की परिसरात मोठ्या प्रमाणात युवक आणि अगदी लहान मुलं देखील ड्रग्स आणि गांजाच्या आहारी जात आहेत. त्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असून कुटुंबांवर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे महिलांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कडक कारवाई करावी, अन्यथा आत्मदहनाचा इशारा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
फ्रेजरपुरा परिसरातील वाढत्या ड्रग्स आणि गांजा विक्रीविरोधात महिलांनी उभारलेला हा आवाज आता प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. पोलिसांकडून या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज.



