तिवसामध्ये एलपीजी दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन; रिकामे सिलेंडर व चूल मांडून निषेध

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीविरोधात महिला काँग्रेस आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी रिकामे गॅस सिलेंडर आणि चूल मांडून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला.
आंदोलकांच्या मते, आखाती देशांमधील परिस्थितीमुळे अमरावती जिल्ह्यासह ग्रामीण भागात एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कपात होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात गॅस टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील महिला आणि शेतकरी कुटुंबांना बसत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकार एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीबाबत उदासीन असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबे, शेतकरी तसेच माता-भगिनींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन देत गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती तातडीने कमी कराव्यात तसेच गॅसचा सुरळीत पुरवठा करावा, अशी मागणी केली. या आंदोलनात प्रकाशराव माहोरे, दिलीपराव काळबांडे, सतीश पारधी, सेतू देशमुख, प्रफुल देशमुख, प्रदीप बोके, मोहनराव वानखडे, भारत ढोणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
तसेच नगराध्यक्ष प्रतिभा गौरखेडे, उपनगराध्यक्ष प्रिया विघ्ने, सभापती रवींद्र राऊत, मुकुंद पुनसे, योगेश वानखडे, महिला काँग्रेस अध्यक्षा रूपाली काळे तसेच माजी सभापती कल्पना दिवे यांचीही उपस्थिती होती.



