नांदेड जिल्ह्यात टोमॅटोचे भाव कोसळले; संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले

नांदेड जिल्ह्यात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, Ardhapur तालुक्यातील लहान गावात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारातील घसरलेल्या दराविरोधात निषेध व्यक्त करत टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले. सध्या बाजारात टोमॅटोला केवळ पाच ते दहा रुपये प्रतिकिलो असा दर मिळत आहे.
दर इतका कमी झाल्याने टोमॅटो तोडणीचा खर्च देखील निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. व्यापारी देखील टोमॅटो खरेदी करण्यास तयार नसल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून त्याचा अक्षरशः लाल चिखल केला.
दरम्यान, टोमॅटो तसेच इतर शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.



