भीषण अपघातात २ सख्ख्या भावांसह ३ अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजवळील शेरी फाट्यावर भीषण अपघातात माळेगाव येथील तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. दुचाकीला आयशर वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
तेल्हारा शहराजवळील शेरी फाट्यावर आज झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. दुचाकी आणि आयशर वाहन यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दर्शन रामेश्वर वैष्णव वय अंदाजे १६ वर्ष, साई रामेश्वर वैष्णव वय अंदाजे १२ वर्ष,
आणि गणेश दीपक आपतुरकर वय अंदाजे १६ वर्ष यांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या तिसऱ्या मुलाचा तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करताना मृत्यू झाला. मृतांपैकी दोघे सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर आयशर वाहन ताब्यात घेण्यात आले असून ते तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. तिन्ही मृतदेहांवर तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे. ही तिन्ही मुले माळेगाव येथील असून तेल्हाऱ्याकडे येत असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वैष्णव आणि आपतुरकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माळेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. अल्पवयीन मुलांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.



