दुचाकी चोरावर पोलिसांची कारवाई, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी जेरबंद

नागपूर शहरातील मानकापूर पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई केली आहे. गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून आरोपीकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. २१ फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तपासादरम्यान संशयित आरोपीची ओळख पटली आणि सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
मानकापूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे दुचाकी चोरट्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



