अमरावतीत तृतीयपंथीयांच्या दोन गटांत तलवारबाजी; ३ ते ४ जण गंभीर जखमी

अमरावती शहरात पुन्हा एकदा तृतीयपंथीयांच्या दोन गटांमधील वाद हिंसक वळणावर पोहोचल्याची गंभीर घटना समोर आली आहे. मंगळवार, २७ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशियाड कॉलोनी परिसरात अचानक तणाव वाढला आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले.
प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून एका गटाने दुसऱ्या गटावर तलवारीसारख्या धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तीन ते चार तृतीयपंथी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमाव पांगवला आणि परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तृतीयपंथीयांची मोठी गर्दी जमली होती.
आरोपींवर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. सध्या गाडगेनगर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून हल्ल्यात वापरलेली शस्त्रे, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई सुरू आहे.



